# पोलादपूरकरांचा घरपट्टीवाढीविरोधात जनआक्रोश मोर्चा अन् कोकणात चर्चा – कोकण न्यूज मराठी
आपला जिल्हा

पोलादपूरकरांचा घरपट्टीवाढीविरोधात जनआक्रोश मोर्चा अन् कोकणात चर्चा

समस्या निवारण समितीच्या पाठपुराव्याला नगरसेवक अन् प्रशासनही अनुकूल

पोलादपूर (संदिप जाबडे)- तालुक्याची ग्रामपंचायत म्हणून नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालेल्या पोलादपूर नगरपंचायतीने गेल्या वर्षापासून केलेली घरपट्टीवाढ पोलादपूरकरांच्या संतापाचे कारण ठरले आणि पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारी हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहापासून बाजारपेठ व महाबळेश्वर मार्गावरून थेट नगरपंचायतीवर धडकलेल्या घरपट्टीवाढीविरोधातील जनआक्रोश मोर्चाची संपूर्ण कोकणात चर्चा होऊ लागली. मोर्चातील सहभागी नागरिकांची वाढती संख्या पाहून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनीदेखील मोर्चात सहभागी होऊन घरपट्टीवाढीला विरोध करण्याची भूमिका घेतली. यानंतर पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनय शिपाई यांनीही घरपट्टीवाढीचा वाढता विरोध लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तसेच प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासंदर्भात लेखी अनुकूलता दर्शविली आहे.

 

शुक्रवारी सकाळी पोलादपूरच्या जुन्या महाबळेश्वर रस्त्यावरील हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहापासून बाजारपेठ व नवीन महाबळेश्वर मार्गावरून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिसरोडवरील छ.शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाला अभिवादन करून पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचाने केलेल्या आवाहनानुसार पुकारलेल्या जनआक्रोश मोर्चाची नगरपंचायत पोलादपूरकडे गगनभेदी घोषणांनी वाटचाल सुरू असताना सत्ताधारी व विरोधी गटाचे चार-पाच नगरसेवकदेखील मोर्चामध्ये सामील झाले.

 

पोलादपूर नगरपंचायतीच्या प्रवेशद्वाराजवळ जनआक्रोश मोर्चाचे रूपांतर जाहिर सभेमध्ये झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष तसेच पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचाचे प्रतिनिधी निलेश सुतार यांनी अन्याय्य घरपट्टीवाढ टाळण्यासाठी प्रशासनावर नगरसेवकांच्या दबावाने शक्य झाले असते. ग्रामपंचायतीच्याच सुविधा आणि नगरपंचायतीचा कर अशी सद्यस्थिती असून यामध्ये सुधारणा घडविण्याऐवजी घरपट्टीवाढ करून अधिकच अडचण निर्माण करीत असल्याचा खेद व्यक्त केला.

 

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी, केवळ घरपट्टीवाढीविरोधातच नव्हे तर नागरिकांना भेडसावणाऱ्या सर्वच समस्यांबाबत पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंच पाठपुरावा करणार असून यापुढे पोलादपूरकरांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी काय केले काय केले नाही याचे पब्लीक ऑडीट करण्यात येणार असल्याचे सांगून घरपट्टी भरणे, हे पोलादपूरकरांचे कर्तव्य आहे; परंतू अन्याय्यरित्या अवाजवी घरपट्टी वसूलीसाठी असहकारही पुकारला जाईल, याची प्रशासनाने जाणीव ठेवावी असे खडे बोल सुनावले.

 

पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचाचे निमंत्रक दर्पण दरेकर यांनी, सदोष मुल्यांकन रद्द करण्याचा ठराव नगरपंचायत,नगरपरिषदा व औद्योगिक नगरी अधिनियमाच्या कलम 105 अन्वये करण्याची मागणी नगरपंचायत प्रशासनाने मान्य केली पाहिजे, कलम 107 नुसार नगरपंचायत मंडळाने विवेकाधिकार वापरून वाढीव घरपट्टीची वसूली तात्काळ थांबविण्याचा ठराव केल्यास मुख्याधिकारी यांना तो अंमलात आणणे भाग पडेल, अशी माहिती देऊन संयुक्त मुल्यांकन समितीच्या स्थापनेची मागणी यावेळी केली. महिला प्रतिनिधी सपना बुटाला यांनी, महिलांच्या डोक्यावरचा हंडा कंबरेवर न आणताच लादलेली वाढीव घरपट्टी अन्यायकारक असल्याची टीका केली. संपूर्ण मोर्चाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त सरकारी अधिकारी नामदेव शिंदे यांनी केले.

 

यानंतर नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी नगराध्यक्ष दालनामध्ये नगरसेवक आणि मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळासमोर ठराव केल्यास जिल्हाधिकारी पातळीवर फेटाळला जाईल, अशा पूर्वीच्याच भूमिकेची रि ओढण्याचा प्रयत्न केला असता घरपट्टी वाढीचा फेरविचार न झाल्यास पोलादपूरकरांनी असहकार केल्यास घरपट्टी जमा करणे अशक्य होईल, याची जाणीव मोर्चेकऱ्यांनी करून दिली. यानंतर मोर्चेकऱ्यांनी खा.सुनील तटकरे, मंत्री भरत गोगावले, मंत्री अदिती तटकरे तसेच मंत्री दर्जाचे भूमिपुत्र आ.प्रवीण दरेकर यांच्याकडेही पोलादपूर नगरपंचायतीबाबतच्या सविस्तर माहितीद्वारे घरपट्टीवाढ कमी होण्याकामी पुनर्मूल्यांकन होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

 

यानंतर मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी, शेवटच्या मालमत्ताधारकाची मोजमापे दुरूस्त करून योग्यरित्या मालमत्ता कर आकारणी करण्यासंदर्भात लेखी पत्र देताना कलम 107 प्रमाणे नगरपंचायतीचा ठराव करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात येईल. मोजमापात चूक असलेल्यांची पुनर्मोजणी करून देण्यात येईल, असे नमूद केले आणि याबाबत पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचाच्या मोर्चेकरी पोलादपूरकरांसमोर स्वत: सामोरे जाऊन निवेदन केले.

 

शेवटी पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचाचे निमंत्रक दर्पण दरेकर यांनी, पोलादपूरकरांवर वाढीव घरपट्टी लादलेली असताना नागरिकांच्या जनआक्रोश मोर्चाकडे न फिरकणाऱ्या नगरसेवकांना नागरिकांनी लक्षात ठेवून योग्य तो निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असा इशारा देत नगरपंचायतीला न्याय्य घरपट्टी देण्यासंदर्भात सर्वच नागरिक अनुकूल आहेत, असे मोर्चाच्या सांगतेप्रसंगी सांगितले. मोर्चामध्ये तीनशेहून अधिक मालमत्ताधारक महिला व पुरूष नागरिकांचा सहभाग लाभला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!