महाड औद्योगिक वसाहतीतील एम्बॉय कंपनीत पुन्हा आग; एका महिन्यात दुसरी घटना, ग्रामस्थ संतप्त

महाड औद्योगिक वसाहतीतील एम्बॉय कंपनीत पुन्हा आग; एका महिन्यात दुसरी घटना, ग्रामस्थ संतप्त
महाड, संदीप जाबडे
महाड औद्योगिक वसाहत परिसरातील एम्बायो (एम बॉय) कंपनीत रासायनिक प्रक्रियेदरम्यान अचानक प्रेशर वाढल्याने छोट्या स्फोटासह आगीची घटना घडली. औषधी उपयोगासाठी तयार केल्या जाणाऱ्या आम्लीय पदार्थांचे उत्पादन सुरू असताना ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या अंतर्गत अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. काही मिनिटांतच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. दरम्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरातील प्रशासन तसेच महाड औद्योगिक वसाहत पोलीस आणि स्थानिक अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्यात आल्या असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
एक महिन्यात दुसरी घटना; ग्रामस्थांमध्ये भीती
विशेष म्हणजे, गेल्या महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने कंपनीलगतच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे औद्योगिक सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून कंपनी प्रशासनाविरोधात स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
रासायनिक उद्योगांमध्ये सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन, यंत्रसामग्रीची नियमित तपासणी, प्रेशर कंट्रोल प्रणालीची कार्यक्षमता आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्षम असणे अत्यावश्यक असते. तज्ज्ञांच्या मते, प्रेशर वाढीमागील नेमके कारण शोधून काढणे, सेफ्टी ऑडिट करणे आणि स्वतंत्र चौकशी करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येणार नाही, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
या घटनेच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील कामगार तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची आणि उच्चस्तरीय चौकशी नेमण्याची मागणी जोर धरत आहे. संबंधित यंत्रणांनी या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.



