बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी : विद्यार्थ्यांकडून वेशभूषा सादरीकरण व वारली पेंटिंग प्रदर्शन

पोलादपूर, संदिप जाबडे
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उच्च माध्यमिक विद्यामंदिर, पोलादपूर येथे आज बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आदिवासी समाजाचे क्रांतिकारक नेते व स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर विद्यालयातील एका विद्यार्थ्याने बिरसा मुंडा यांच्या पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या सादरीकरणाची सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रशंसा केली.
या निमित्ताने विद्यालयात वारली पेंटिंगचे विशेष प्रदर्शन भरवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वारली चित्रांच्या माध्यमातून भारतीय आदिवासी कलेचा समृद्ध वारसा उजागर केला.
कार्यक्रमात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांना ड्रोन उडवण्याचे थरारक प्रात्यक्षिक विद्यालयाचे उपशिक्षक श्री पंकज मिरजोळकर यांच्यामार्फत दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ड्रोनचे कार्य, त्याचे नियंत्रण आणि उपयोग याची माहिती घेत उत्साहात सहभाग घेतला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवर्गाच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.



