रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, पोलादपूर येथे जागतिक मराठी दिन उत्साहात साजरा

पोलादपूर, संदीप जाबडे
रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, पोलादपूर येथे जागतिक मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठी भाषेचे महत्त्व, समृद्ध परंपरा व सांस्कृतिक वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेच्या गौरवपर गीताने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी कविता सादरीकरण, भाषण, सुविचार व लघुनाट्य अशा विविध उपक्रमांतून मराठी भाषेचा गौरव केला. मराठी भाषेचे संवर्धन व जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या प्राचार्य, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण शाळा परिसरात मराठी भाषेच्या अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.



