महाड खाडीपट्ट्यात माकडांची दहशत,८१ वर्षीय वृद्धावर जबरी हल्ला

महाड, मितेश नवले
महाड येथील खाडीपट्टा परिसर आणि गावांमध्ये जंगली माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे
बेबलघर येथील ८१ वर्षीय रहिवासी नारायण विश्राम चिबडे यांच्यावर एका माकडाने हल्ला करून जखमी केले. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. त्यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी घरी बसलेले असताना एका माकडाने घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. त्याच्या डाव्या हाताला चावा घेतला त्याच्या बोटांवर चावामुळे खूप रक्तस्त्राव झाला होता. तसेंच अंगावर इतर ठिकाणी माकडाच्या नखांमुळे जबर जखमा
झाल्या .
चिबडे यांना प्राथमिक उपचारांसाठी चिंभावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आणि नंतर पुढील उपचारांसाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
जखम अधिक खोल असल्याने त्यावर चार टाके लावण्यात आले. रुग्णाची तपासणी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयातील सर्जनकडून करून घेण्याचा सल्लाही महाड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.
गेल्या दोन ते तीन वर्षांत खाडी परिसरात वन्य माकडांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. नागरिकांनी सांगितले की, माकडांच्या या वाढत्या संख्येमुळे घरातील तयार केलेले अन्न खातात, भांडी उलटी करतात आणि घरांच्या छताच्या कौलेही फोडतात.परिसरात लावलेली पालेभाज्या,व फळ झाडे यांचे प्रचंड नुकसान करतात अशा खोडकर माकडांपासून त्यांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
त्यामुळे खाडी परिसरातील नागरिकांनी यावेळी बोलताना संबंधित वन अधिकाऱ्यांनी या जंगली माकडांवर तात्काळ कारवाई करावी जंगली माकडांची वाढती संख्या आणि त्यामूळे नागरिकांना होणारा त्रास, या विषयाची स्थानिक प्रशासनाने तात्काळ गांभीर्याने घ्यावी व वनविभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.



