# पोलादपूर तालुक्यात अवैध रेती व्यवसाय जोमात; प्रशासन कोमात? – कोकण न्यूज मराठी
ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलादपूर तालुक्यात अवैध रेती व्यवसाय जोमात; प्रशासन कोमात?

पोलादपूर, संदीप जाबडे

पोलादपूर तालुक्यातील सावित्री, ढवळी आणि कामथी नदीपात्रात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या अंधारात रेती माफियांचा उघडपणे हैदोस सुरू असून, प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

“आपली माती, आपली माणसं” या सामाजिक संस्थेचे संस्थापक राज पार्टे यांनी याबाबत कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी रायगड यांना मेल द्वारे तर तहसीलदार कार्यालय पोलादपूर येथे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष निवेदन दिले आहे. मात्र, तक्रारीनंतरही अवैध वाळू उपसा थांबलेला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नदीपात्रातील नैसर्गिक संतुलन बिघडत असून, पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, जेसीबी यांसारख्या यंत्रसामग्रीच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी रेती उपसा केला जातो आणि सकाळ होण्यापूर्वी डंपरद्वारे त्याची वाहतूक केली जाते. यामुळे शासनाला महसुलाचे मोठे नुकसान होत आहे.

दरम्यान, “रेती माफियांना अभय कुणाचे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून अवैध व्यवसायावर अंकुश आणावा, अशी मागणी जोर धरत आहे. जर लवकरात लवकर कठोर पावले उचलली नाहीत, तर आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था कठोर पावले उचलणार असल्याचा ईशारा संस्थेचे संस्थापक राज पार्टे यांनी दिला आहे

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!