श्रीराम विद्यालय लोहारे येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा व शालेय साहित्याचे वाटप

पोलादपूर, संदीप जाबडे :
पोलादपूर तालुक्यातील श्रीराम विद्यालय लोहारे येथे शुक्रवार, १९ जून २०२६ रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. श्रीराम विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाने विविध दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. दहावीमध्ये श्वेता संदीप साळुंखे हिने ९३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, ज्ञानेश्वरी राकेश उतेकर हिने ८३.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर स्वाती महादेव नाटकर हिने ८३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मागील चाळीस वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तुर्भे गावचे सुपुत्र समाजसेवक शिवराम उतेकर यांचा विद्यालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
माजी विद्यार्थी संघाच्या वतीने विद्यालयातील १२५ विद्यार्थ्यांना अर्धा डझन वह्या, कंपास पेटी व छत्र्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवराम उतेकर यांनी १० हजार रुपये, तर सहयोग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण यांनी ५ हजार रुपये देणगी स्वरूपात प्रदान केले.
या उपक्रमासाठी शिवराम उतेकर, गणेश जाधव यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाला शिवराम उतेकर, रमेश चव्हाण, सरपंच दीपक पवार, लिलाजी शेडगे, अनिल नरे यांच्यासह ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी विद्यार्थी गोविंद साळुंखे, भाऊ वाडकर, अमित वाडकर, श्रीकांत चव्हाण, धर्मेश नरे, सीमा साळुंखे, तसेच उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक कुरडूणकर आणि श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक धनाजी काळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगतीची प्रेरणा निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



