ग्राहकांच्या संयमाची परीक्षा; भारत गॅस एजन्सीसमोरील गैरसोयींकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे

रोहा, रुपेश रटाटे
रोहा शहरासह परिसरातील अनेक गावांमधून भारत गॅस एजन्सीच्या सेवेसाठी येणाऱ्या ग्राहकांना सध्या मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वयोवृद्ध नागरिक, महिला वर्ग आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांची अक्षरशः दमछाक होत आहे.
गॅस सिलेंडर घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना चिखलातून वाट काढत रांगेत उभे राहावे लागत आहे. आधीच बाजारपेठेच्या मागील बाजूस घाणीचे साम्राज्य पसरलेले असताना, दुर्गंधीयुक्त वातावरणात अनेकांना नाकावर रुमाल किंवा फडके धरून प्रतीक्षा करावी लागत असल्याची खंत ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. ही परिस्थिती केवळ गैरसोयीची नसून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही चिंताजनक आहे.
गॅस ही दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक सेवा असल्याने ग्राहकांना अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागणे दुर्दैवी म्हणावे लागेल. पावसाळ्यातील परिस्थितीचा विचार करून संबंधित एजन्सी प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. ग्राहकांना उभे राहण्यासाठी सुरक्षित आणि स्वच्छ जागा, चिखलमुक्त मार्ग तसेच आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही एजन्सीची सामाजिक जबाबदारी आहे.
संबंधित ठेकेदार आणि जबाबदार यंत्रणांनी याकडे वेळीच लक्ष देऊन पर्यायी जागेची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. अन्यथा ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत झाल्यास तीव्र नाराजीचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सेवाच जर त्रासाचे कारण ठरत असतील, तर त्याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या अडचणी दूर करून त्यांना सन्मानाने सेवा मिळेल, यासाठी संबंधितांनी तातडीने पावले उचलावीत, हीच अपेक्षा.



