लता सकपाळ वयाच्या ५२ व्या वर्षी दहावी उत्तीर्ण; कुडपण येथील गृहिणीची जिद्द ठरली प्रेरणादायी

पोलादपूर, संदीप जाबडे
“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पियेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रत्यय पोलादपूर तालुक्यातील कुडपण गावातील एका जिद्दी महिलेने आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे.
कुडपण गावातील सोनावणे परिवारातील लता रमेश सोनावणे(लता गोपाळ सकपाळ-माहेरचे नाव) यांच्यासोबत मागील ३० वर्षांपासून संसाराचा गाडा चालवित असताना वयाच्या ५२ व्या वर्षी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे विवाहानंतर संसाराची जबाबदारी, तीन मुलांचे संगोपन तसेच नातवंडांची जबाबदारी सांभाळत त्यांनी शिक्षणाची ओढ कायम जपली.
सन १९९५ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. मात्र शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत मनात असल्याने त्यांनी जिद्दीने सन २०२६ मध्ये पुन्हा शाळेत प्रवेश घेतला. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी दहावीच्या परीक्षेत ४३ टक्के गुण मिळवत यश संपादन केले.
त्यांच्या या यशामुळे सकपाळ व सोनावणे परिवारामध्ये आनंदाचे वातावरण असून समाजातील अनेक महिलांसाठी त्यांनी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. “शिक्षणासाठी वयाची अट नसते, इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही,” असा संदेश त्यांच्या यशातून मिळत असल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली.
त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



