स्वराज्य युवा प्रतिष्ठान, साखर यांच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी
सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे शौर्य पुरस्कार राज गणपत पार्टे यांना प्रदान

पोलादपूर, संदीप जाबडे
स्वराज्य युवा प्रतिष्ठान, साखर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला युवासेना कोअर कमिटी सदस्य व रायगड जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य चंद्रकांत कळंबे, जिल्हा परिषद सदस्य निलेश कुंभार, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष कृष्णा कदम, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र मालुसरे, नगरसेवक सिद्धेश शेठ, कोकण न्यूज मराठीचे संपादक संदीप जाबडे यांसह सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि त्यांच्या आदर्शांवर प्रकाश टाकला. तसेच तरुणांनी शिवरायांच्या विचारांवर चालत समाजकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रसंगी परिसरातील शिवप्रेमी नागरिक, युवक, स्वराज्य युवा प्रतिष्ठान साखरचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिवजयंतीच्या निमित्ताने महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. साखर गावच्या महिलांनी मोठ्या संख्येने हळदी कुंकू समारंभात सहभाग घेतला.
सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे शौर्य पुरस्कार राज गणपत पार्टे यांना प्रदान
सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेच्या स्मरणार्थ दिला जाणारा सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे शौर्य पुरस्कार यंदा राज गणपत पार्टे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेची स्थापना करून पोलादपूर तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल व तळागाळातले जनसामान्यांचे प्रश्न निःस्वार्थीपणे मार्गी लावल्याने राज पार्टे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.



