‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

महाड, संदीप जाबडे
राजमाता जिजाऊ शिव-शंभु प्रतिष्ठानच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत राजेवाडी येथील स्वराज्य निवारा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत गरजू वृद्धांना मदतीचा हात देण्याचा संस्थेचा हा स्तुत्य उपक्रम ठरला.
या उपक्रमात संस्थेचे हितचिंतक अभिजित राजु सपकाळ यांच्या सहकार्याने तसेच संस्थापक निलेश लक्ष्मण पवार, अध्यक्ष दिग्विजय गणपत भोंडवे, उपाध्यक्ष शिवकन्या संजना अमित भिसे, आशुतोष राजु सपकाळ आणि विनोद गंगाराम जावध यांच्या उपस्थितीत किराणा सामानाचे वितरण करण्यात आले. यामध्ये तेल, तांदूळ, साखर, चहापत्ती, पीठ आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.
राजमाता जिजाऊ शिव-शंभु प्रतिष्ठान यापूर्वीही शैक्षणिक साहित्य वाटप, गोरगरिबांना अन्नधान्य वितरण, तसेच गडकोट संरक्षण मोहीम यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.
संस्थेच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे समाजसेवा सुरू ठेवण्याचा निर्धार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.



