खाडीपट्ट्यात दुग्ध संकलन केंद्राचा शुभारंभ;शेतकऱ्यांसाठी आर्थिक प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या

चोचिंदे येथील खाडीपट्टयातील दुसऱ्या दूध संकलन केंद्राच्या शुभारंभ सोहळ्याला मोठ्या उत्साहाने शेतकरी बांधव हजर होते. या सोहळ्याचे आयोजन वाशिष्टी डेअरीच्या वतीने करण्यात आले, आणि या कार्यक्रमाचे उदघाटन वाशिष्टी डेअरीचे संस्थापक प्रशांत यादव यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून वाशिष्टी डेअरी मुख्य कार्यवाहक साधना यादव, संचालक महेश खेतले, व्यवस्थापक प्रदीप मगदूम, हर्षद चाळके, तसेच सीएस धोंडगे ऍग्रो डेअरी फार्मचे संस्थापक चंद्रकांत धोंडगे, संचालक सुरेश धोंडगे, संतोष पाठक, पत्रकार रघुनाथ भागवत, पशुवैद्यकीय अधिकारी सोनाली अहिरे, आणि स्थानिक पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने स्थानिक शेतकरी, दुग्ध व्यवसायातील व्यावसायिक, आणि ग्रामविकास कर्मचारी सहभागी झाले होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत गावोगावातून येणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन करतेवेळी यादव यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “शेतकऱ्यांना अनेक अडचणींशी सामना करावा लागतो, पण त्यावर मात करून प्रगती साधता येते. आपली डेअरी सातत्याने हमी भावापेक्षा जास्त दर देत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत आहे. डेअरी ही केवळ व्यवसाय नाही, तर ही एक सेवा आहे. गेल्या दोन वर्षांत, या व्यवसायात सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे, आणि ही वृद्धी पाहून मन प्रसन्न होते.”
यांनी पुढे सांगितले की, “आता आपल्याला जनावरांची संख्या वाढवावी, त्यांची चांगली काळजी घ्यावी, चाऱ्याची योग्य व्यवस्था करावी, आणि पशुवैद्यकीय सल्ल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. दुधाची गुणवत्ता, फॅट प्रमाण, आणि जनावरांची स्वच्छता यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत.”
चंद्रकांत धोंडगे यांनी आपल्या मनोगतात भागातील शेतकऱ्यांचे सहकार्य आणि मेहनत यामुळे आज त्यांच्या विभागात दोन डेअरी आहेत, आणि पुढील दोन वर्षांत आणखी एक नवीन डेअरी उभारण्याचा उद्देश त्यांनी ठेवल्याचे सांगितले. “सुरुवातीला चार-पाच शेतकरी होते, आता संख्या पन्नासच्या वर आहे. ही प्रगती आम्हाला प्रेरणा देते,” असे त्यांनी नमूद केले.
कोणतेही राजकारण मध्ये न आणता त्यांना प्रामुख्याने शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आम्ही कार्यरत राहू
धोंडगे यांनी पुढे म्हटले की, “मला खात्री आहे की, या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातून दुधाची मागणी वाढेल, आणि कोकणातील दुग्धव्यवसायाला नवीन उर्जा मिळेल यातून माझा शेतकरी बांधव हा आर्थिक दृष्ट्या स्वावलंबीत आणि प्रगत होईल.”
या कार्यक्रमाची प्रस्तावना गणेश कुर्डूनकर यांनी केली, तर सूत्रसंचालन गणपत मालप यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थ, आणि विभागीय अधिकारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाने कोकणातील दुग्ध व्यवसायाला नवी ऊर्जा दिली आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन, योग्य मार्गदर्शन, आणि सहकार्याने, या क्षेत्रात प्रगती होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. वैभवाचा हा भाग पुन्हा उभा राहील, आणि कोकणाची अर्थव्यवस्था आणि संस्कृती अजूनही मजबूत होईल, असे अभिप्रेत आहे.