महाड एमआयडीसीतील सुदर्शन कंपनीत वायूगळती,४ कामगारांना किरकोळ लागण
कंपनी व्यवस्थापनाकडून वायू गळती नियंत्रणात

महाड, संदीप जाबडे
महाड औद्योगिक वसाहतीतील प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुदर्शन केमिकल कंपनीत सोमवारी सायंकाळी 6 चे सुमारास वायू गळतीची घटना घडली आहे. सुदर्शन केमिकल कंपनीतून क्लोरीन वायूची गळती झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर कंपनीतील सर्व कामगारांना तातडीने सुरक्षितरित्या कंपनीच्या बाहेर काढण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन तसेच आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या . प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार कंपनी व्यवस्थापनाकडून वायू गळती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न यशस्वीरीत्या करण्यात आले असून कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
या वायू गळतीच्या घटनेत चार कामगार किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र नेमके किती कामगार जखमी झाले आहेत, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलीस प्रशासनाकडून घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे.



