# वैद्यकीय व पॅरामेडिकल क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा विद्या कोचिंग क्लासेसतर्फे सत्कार – कोकण न्यूज मराठी
आरोग्य व शिक्षण

वैद्यकीय व पॅरामेडिकल क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा विद्या कोचिंग क्लासेसतर्फे सत्कार

महाड, संदिप जाबडे

विद्या कोचिंग क्लास, सिद्धार्थ प्री स्कूल आणि सिद्धार्थ स्टेशनरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १६ नोव्हेंबर रोजी गुजराती समाज हॉल, बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा पार पडला. ‘ज्ञानाचा मार्ग’ या विषयावर आधारित या कार्यक्रमाला १०० हून अधिक पालक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे वैद्यकीय व पॅरामेडिकल क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना ‘स्टार्स ऑफ व्हीसीसी’ संबोधत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई, पनवेल, रत्नागिरी, बेंगळुरू, नगर तसेच रशिया येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते १०वी, १२वी, शिष्यवृत्ती, ब्रेन डेव्हलोपमेंट स्कॉलरशिप, महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय परीक्षा यामध्ये विशेष प्रविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशस्ती पत्रक देऊन अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक विनय विनोद खैरे यांनी संस्थेच्या प्रवासाचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचे कौतुक केले.

 

कार्यक्रमाला डॉ. महेश बागडे (ओम साई संस्था व साई छाया चॅरिटेबल ट्रस्ट), माजी मुख्याध्यापक अशोक जाधव,(अध्यक्ष-बौद्धजन पंचायत समिती महाड), माजी जिल्हा परिषद सदस्या समाजसेविका अपर्णा येरुणकर, नवयान बौद्ध युवा संघ अध्यक्ष डॉ. राहुल निकम, शशिकांत खैरे, अरुण गायकवाड, सुबोध मोरे, सतीश मोरे, शैलेश गायकवाड, दिनेश भोसले, डॉ. शलाका बागडे, सारिका जाधव उपस्थित होते. शिक्षणाचे सामाजिक परिवर्तनातील महत्त्व, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील संधी आणि करिअर उभारणीसाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास यांवर सर्वांनी प्रकाश टाकला.

 

कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे डॉ. रुचिता राऊत यांनी सादर केलेले मनःशक्ती, मानसिक स्वास्थ्य आणि अंतर्ज्ञान विकासावर आधारित संवादात्मक प्रात्यक्षिक. विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्साहाने भाग घेत मानसिक आरोग्याच्या गरजेची जाणीव व्यक्त केली. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन आणि नाट्य सादरीकरणांमधून आपली कलात्मक प्रतिभा सादर केली. शिक्षक नेहा यांनी संस्थेचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक संगोपनाचे तत्त्व उपस्थितांसमोर मांडले.या सर्व कार्यक्रमाचे अचूक नियोजन करण्यासाठी सिद्धार्थ प्री स्कूल च्या सहशिक्षिका नेहा धारिया यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा सकपाळ यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पाडले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवर, पालक आणि शिक्षकांचे आभार मानत वर्षभराच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वार्षिक सोहळा उत्साही वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरल्याचे मत अनेक पालकांनी व्यक्त केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!