कापडे जिल्हा परिषद गटातून उच्च शिक्षित डॉ निलेश काशिनाथ कुंभार यांना शिवसेनेची उमेदवारी
मंत्री भरत गोगावले यांनी तरुण उमेदवारावर विश्वास दाखवल्याने तरुणांमध्ये उत्साह

पोलादपूर, विशेष प्रतिनिधी
मागील चार वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या रायगड जिल्हा परिषद निवडणुकांची अखेर घोषणा झाली असून १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६ दरम्यान नामनिर्देश पत्र दाखल करण्यात येणार आहे. मात्र निवडणूकांची घोषणा होण्यापूर्वीच मागील दोन महिन्यांपासून इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चे बांधणी केली होती. गाव बैठका, पक्षश्रेष्ठींकडे कार्यकर्त्यांकडून शिफारशी, विभागीय मतांची समीकरणे, सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांनी स्थानिक नेतृत्वाची डोकेदुखी चांगलीच वाढवली. यातच शिवसेनेकडून कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटासाठी चार जण इच्छुक असल्याने उमेदवारीची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. मात्र नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला वाकण गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुमन काशिनाथ कुंभार यांचे सुपुत्र नुकतीच डॉक्टरेट ही पदवी उत्तीर्ण झालेले डॉक्टर निलेश काशिनाथ कुंभार यांच्या नावावर शिवसेनेचे उपनेते मंत्री भरत गोगावले, युवासेना महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले, रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील उच्चशिक्षित उमेदवाराला शिवसेना पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्याने पोलादपूर तालुक्यातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
डॉक्टर निलेश कुंभार यांचा थोडक्यात परिचय
देवळे (सध्याचा कापडे बुद्रुक) जिल्हा परिषद गटातून मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आघाडीतून ५१६ मतांनी विजयी झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या सुमन काशिनाथ कुंभार यांचे डॉ. निलेश काशिनाथ कुंभार हे सुपुत्र आहेत. पोलादपूर व सातारा येथे शालेय शिक्षण घेतलेल्या एका सामान्य विद्यार्थ्याला शिक्षणाच्या जोरावर Indian Institute of Technology (IIT) Indore येथे PhD करण्याची व जपानमधील National Institute for Materials Science (NIMS) येथे संशोधन करण्याची संधी मिळाली. परदेशातील संशोधन अनुभव, ९ वर्षांचा अध्यापनाचा काळ, तसेच ९ देशांतील आंतरराष्ट्रीय परिषदांमधील सहभाग डॉ. निलेश कुंभार यांनी घेतला आहे.



