रानवडी बुद्रुक व वडाचाकोंड शाळेने घेतली जालिंदरनगर व वाबळेवाडी शाळांची भेट
शाळेचे मुख्याध्यापक सोपान चांदेंच्या प्रयत्नांना यश

पोलादपूर, संदीप जाबडे
जागतिक दर्जाचे पुरस्कार मिळालेली पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदरनगर ही शाळा. २०२२ मध्ये जालिंदरनगर या शाळेचा पट हा केवळ २ इतका होता. मात्र वाबळेवाडी या आंतरराष्ट्रीय शाळेचे निर्माते दत्तात्रय वारे गुरुजींची जालिंदरनगर या शाळेवर बदली झाली आणि या शाळेचा कायापालट झाला. केवळ २ पटसंख्या असणाऱ्या शाळेत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात १४० विद्यार्थी शिकत आहेत. याशिवाय नवीन शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी शेकडो विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत. जालिंदरनगर या शाळेत २१ कौशल्ये व ५ जागतिक भाषा शिकवल्या जातात. दिवसाचे १२ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत असतात. पालकांच्या सहकार्याने शाळेत क्रांती घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जागतिक दर्जाची जालिंदर नगर शाळा व मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे गुरुजी आहेत.
पोलादपूर सारख्या ग्रामीण भागातील रानवडी बुद्रुक व वडाचाकोंड या शाळेतील विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी जागतिक दर्जाच्या जालिंदरनगर व वाबळेवाडी या शाळांची भेट घेतली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रानवडी बुद्रुक शाळेचे मुख्याध्यापक व अखिल रायगड शिक्षक संघांचे रायगड जिल्हाध्यक्ष सोपान चांदे यांनी त्यांचे पुणे जिल्ह्यातील निवृत्त सहकारी शिवाजीराव वाळके यांच्या माध्यमातून भेट घडवून आणली. या अभ्यास दौऱ्यात वडाचाकोंड शाळेचे मुख्याध्यापक अमोल मोरे,शिक्षक पोपट काळे, गणेश मुंढे, वंदना मोरे, अरुणा सोडनवर, अध्यक्ष सखाराम वारे, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थी उपस्थित होते. रानवडी बुद्रुक, वडाचाकोंड शाळेतील पालकांनी या अभ्यास दौऱ्यानंतर समाधान व्यक्त केले व मुख्याध्यापक सोपान चांदे यांचे आभार मानले.



