पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सूचनेनुसार पोलादपूर पोलिसांचा ‘धुरंधर’ चित्रपट अनुभव

पोलादपूर, संदीप जाबडे
रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सूचनेनुसार पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंढे, उपनिरीक्षक सतीश पवार यांसह सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार व कर्मचाऱ्यांनी ‘धुरंधर’ हा चित्रपट एकत्रितपणे पाहिला.
या चित्रपटात समाजातील वास्तव परिस्थिती, गुन्हेगारी, तसेच त्यावर मात करण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द आणि प्रामाणिकपणा प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता प्रेक्षकांना एक सकारात्मक संदेश देतो. ‘धुरंधर’ चित्रपटात दाखविण्यात आलेल्या धैर्य, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यपरायणतेच्या मूल्यांमुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या कामात नवचैतन्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
चित्रपटानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये विविध प्रसंगांवर चर्चा करण्यात आली. अशा उपक्रमांमुळे पोलीस दलातील मानसिक ताण कमी होऊन सकारात्मकता वाढण्यास मदत होते, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
चौकट
या उपक्रमाचा उद्देश पोलीस दलामध्ये प्रेरणा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक भान अधिक दृढ करणे हा आहे. अशा प्रकारचे उपक्रम पुढील काळातही राबविण्यात येतील. – आनंद रावडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलादपूर पोलीस ठाणे)


