नदीपात्रातील कचरा जाळून तात्पुरती मलमपट्टी लावण्याची नगरपंचायत प्रशासनाची ‘शक्कल’
कचरा जाळून वायुप्रदूषण होत असल्याची आली नाही का 'अक्कल'?

पोलादपूर, प्रतिनिधी
पोलादपूर शहरातील डंपिंग ग्राउंडच्या गंभीर समस्येविरोधात “आपली माती, आपली माणसं” या सामाजिक संस्थेने ३० एप्रिल रोजी पोलादपूर नगरपंचायतीला आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या पूर्वसंध्येला प्रशासनाकडून नदीपात्रातील कचरा काढण्यास सुरुवात करण्यात आली असली, तरी ही केवळ तात्पुरती मलमपट्टी असल्याची टीका संस्थेकडून करण्यात आली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी नदीत घनकचरा टाकण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या पोलादपूर नगरपंचायतीच्या घंटा गाडीला संस्थेचे संस्थापक राज पार्टे यांनी स्वतः चालवित नगरपंचायतीच्या आवारात आणून या गंभीर समस्येचा निषेध नोंदवून नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. यानंतर लेखी पत्राद्वारे ३० एप्रिल २०२६ रोजी तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी दिला. या ईशाऱ्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम हे नगरपंचायत प्रशासन करीत आहे.
संस्थेचे संस्थापक राज पार्टे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्हाला तात्पुरत्या उपाययोजना नकोत, तर कायमस्वरूपी योजना राबविणे आवश्यक आहे.” त्यांनी आंदोलनाच्या पवित्र्यावर ठाम राहण्याचा इशाराही दिला.
दरम्यान, नदीपात्रातील कचरा प्रत्यक्ष काढण्याऐवजी तो त्याच ठिकाणी जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे वायू व जल प्रदूषणात अधिक भर पडत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. तसेच, सुमारे ३० ते ४० गुरे जळून उरलेल्या कचऱ्यावर उपजीविका करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व घनकचरा टाकला जात असल्याने पावसाळ्यात हा कचरा पाण्यात मिसळून नदीत वाहून जातो. याच नदीलगत असलेल्या जॅकवेलमधून गावांना पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
“नदीपात्रातील कचरा समूळ काढून टाकावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा राज पार्टे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलादपूर नगरपंचायतीने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.

