# पोलादपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा,चित्रकार पेंटर नितेश देवघरकर हे ‘वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२५’ पुरस्काराने सन्मानित – कोकण न्यूज मराठी
आरोग्य व शिक्षण

पोलादपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा,चित्रकार पेंटर नितेश देवघरकर हे ‘वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२५’ पुरस्काराने सन्मानित

पोलादपूर, संदीप जाबडे

ऐतिहासिक पोलादपूर तालुक्याचा गौरव वाढविणारे पोलादपूरचे सुप्रसिद्ध चित्रकार पेंटर श्री. नितेश विश्वनाथ देवघरकर (देवघरकर पेंटर)- ड्राॅईंग पेंटिंग आर्टिस्ट, चित्रकार यांना World Constitution and Parliament Association (WCPA) अर्थात जागतिक संविधान व संसद संघटना, महाराष्ट्र चॅप्टर- श्रीरामपूर (अहिल्यानगर – महाराष्ट्र) च्या वतीने सर्वोत्तम व सर्वोत्कृष्ट अधिकृत पुरस्कार ‘वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२५’ (जागतिक संसद आंतरराष्ट्रीय पुरस्कार ) प्रदान करण्यात आला आहे.

हा पुरस्कार सोहळा बुधवार दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी शासकीय व्ही आय पी गेस्ट हाऊस, रेमंड होम जवळ, संगमनेर रोड, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. शिवाजी दत्तात्रय राजे जाधव (शिंदखेडराजा, राजे लखुजीराव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूज्य मातोश्री जिजाऊ माॅं साहेब यांचे माहेरचेवंशज) यांच्या शुभ हस्ते चित्रकार पेंटर नितेश देवघरकर (पेंटर) यांना सन्मानचिन्ह व गौरव पत्र प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. संजयकुमार रंगनाथ राजेघोरपडे (छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार संताजीराजे राजेघोरपडे यांचे वंशज), कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ दिनकर श्रीधर पतंगे (अध्यक्ष, महाराष्ट्र व गोवा राज्य स्वराज्य ग्राहक न्याय व कल्याण समिती, नवी दिल्ली), पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वर्ल्ड पार्लमेंटच्या माध्यमातून कार्य करणारे WCPA चे महाराष्ट्र चॅप्टर अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे, प्रकाश कुलथे (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र शासन संपादकीय मंडळ, मुंबई), किसन बबन कांबळे (जिल्हाध्यक्ष, सोलापूर शिक्षक संघटना), शंकर अंदानी (ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ), सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय डोंगरे, डॉ. सुभाष देशमुख, विठ्ठलराव सोनवणे, अमोल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

चित्रकार पेंटर नितेश विश्वनाथ देवघरकर (देवघरकर पेंटर) यांनी पोलादपूर, महाड, रायगड, रत्नागिरी, सातारा, मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यात विविध प्रकारची चित्रे, लेटरींग, डिझाईन पेंटिंगची कामे केलेली आहेत. देवघरकर पेंटर यांचे विशेष म्हणजे चित्रकार म्हणून कॅनव्हास पेंटिंग वर मर्यादित न राहता त्यांनी चित्रकला या कलेच्या वाढीकरिता, प्रसाराकरिता, चित्रकला हाताची कला जीवंत राहण्याकरिता कलेच महत्त्व लहान थोरांना कळावे याकरीता ते आजपर्यंत गेली २५ वर्षे जन माणसात जाऊन गावोगावी वेगवेगळ्या प्रकारच्या कॅनव्हासवर आपली कला सादर करीत आहेत. त्यांनी शाळेच्या बोलक्या भिंती चित्र, लेटरींग स्वरूपात स्प्रे पेंटिंग व हॅण्ड पेंटिंग करणे, याप्रमाणे अंगणवाडी पेंटिंग, ग्रामपंचायतीमध्ये माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ भारत अभियान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान इ. अभियान चित्रे, संदेश, घोषवाक्ये पेंटिंग, ॲडव्हर्टाइझींग वाॅलपेंटींग, काॅम्प्यूटर टाईप आकर्षक साईन बोर्ड पेंटिंग करणे, पर्यावरण पूरक बॅनर पेंटिंग (साधे,रंगीत) , गावातील प्रवेशद्वार पेंटिंग, मंदिरामध्ये देवदेवतांची चित्रे पेंटिंग करणे, मूर्ती पेंटिंग, व्यक्तीचित्रे (पोर्ट्रेट पेंटिंग) , पेन्सिल स्केचिंग, ट्रक- टेम्पोवर डिझाईन व लेटरींग पेंटिंग, सार्वजनिक गणेशोत्सवाचे समाज प्रबोधन विषयावर स्टेज डेकोरेशन करणे, थर्माकोल आर्ट, MIDC ले- आऊट साईन बोर्ड पेंटिंग, रेडीयम हॅण्ड वर्क, वेगवेगळ्या भाषेची लेटरींग अशाप्रकारे विविध प्रकारची चित्रकला पेंटिंग विविध प्रकारच्या कलर माध्यमामध्ये करीत आहेत, असे हे ऑलराऊंडर आर्टिस्ट म्हणून समाजात आपली ओळख निर्माण करणारे देवघरकर पेंटर.

चित्रकार देवघरकर पेंटर हे आपला पेंटिंग व्यवसाय सांभाळून मुलांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी ‘देवघरकर आर्ट क्लासेस ‘ व खाजगी शाळेमध्ये ड्राॅईंग गेस्ट लेक्चरर म्हणूनही काम पाहिले आहे . आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात चित्रकला पेंटिंग हळूहळू लोप पावत चालली आहे, तरीही आपल्या कलेच्या आधारे चित्रकलेचा ध्यास अंगी बाळगून चित्रकला कला ही जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या अविरत कला सेवेला, सातत्यपूर्ण कला, मानवी समाजासाठी कलेच्या रूपात केलेल्या योगदानाची दखल घेऊन जागतिक संविधान व संसद संघटना (WCPA) महाराष्ट्र चॅप्टर- श्रीरामपूर (अहिल्यानगर) च्या वतीने ‘जागतिक संसद आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.

चित्रकार देवघरकर पेंटर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गिम्हवणे (सुतार वाडी) गावचे. ते अनेक वर्षांपासून चित्रकलेच्या अभ्यासात व सर्वात रमत असून त्यांची कलाकृती नेहमीच प्रेरणादायी ठरल्या आहेत. त्यांना यापूर्वीही चित्रकलेच्या कार्याची दखल घेऊन दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (रजि.)अमरावती वतीने ‘राज्यस्तरीय आर्टिस्ट ऑफ द इयर २०२५’ (ड्राॅईंग पेंटिंग आर्टिस्ट, चित्रकार) पुरस्कार प्राप्त झाला आहे आणि आता या जागतिक संसद आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे पोलादपूर तालुक्याचे नाव महाराष्ट्रासह विश्वपातळीवर पोहोचले आहे. हा सन्मान माझ्या कला जीवनातील महत्वाचा टप्पा असून आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रकलेला एक व्यासपीठ प्राप्त झाले आहे त्यामुळे मला सन्मानित केल्याबद्दल जागतिक पातळीवर सातत्याने सामाजिक, पर्यावरण व कायदे क्षेत्रात कार्यरत असणारी वर्ल्ड कन्स्टीट्यूशन ॲन्ड पार्लमेंट असोसिएशन (WCPA) महाराष्ट्र चॅप्टर- श्रीरामपूर चे सन्माननीय अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे व संघटनेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल चित्रकार नितेश विश्वनाथ देवघरकर (देवघरकर पेंटर) यांच्यावर शैक्षणिक, सामाजिक राजकीय व इतर क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून पोलादपूर तालुक्यातील कला- प्रेमींमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!