सॅमसंग नॅशनल इन्होव्हेशन २०२५ प्रकल्प स्पर्धेत आदिश शेळके व भाग्यश्री मीना यांना २५ लाखांची इनक्युबेशन संशोधनवृत्ती : आयआयटी ( दिल्ली)त करणार पुढील संशोधन

संभाजीनगर : सॅमसंग ही आंतरराष्ट्रीय कंपनी, केंद्र सरकारचा इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग व आयआयटी -दिल्लीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ सॅमसंग सॅाल्व्ह फॅार टुमारो “ या देशपातळीवरील अतिशय प्रतिष्ठित इन्होव्हेशन आयडिया शोधप्रकल्पस्पर्धेत संभाजीनगरचे आदिश अभिजित शेळके व भाग्यश्री मीना यांच्या “ नेक्स्टप्ले -एआय” या नाविन्यपूर्ण शोधप्रकल्पास २५ लाख रूपयांची भारतीय स्तरावरील इनोव्हेशन -इनक्युबेशन संशोधनवृत्ती नवीदिल्लीतील विशेष समारंभात घोषित झाली आहे. याशिवाय या दोन युवा संशोधकांना एक लाख रुपये रोख व सॅमसंग एआय फोन देण्यात आला आहे.
देशभरातून या राष्ट्रीय नाविन्यपूर्ण प्रकल्प स्पर्धेत वीस हजार युवक-युवतींनी सहभाग नोंदविला व त्यातीस चार सर्वोत्तम प्रकल्पांना प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे एक कोटी इनक्यूबेटर संशोधनवृत्ती दिल्लीच्या आयआयटीमधील “ फाउंडेशन फॉर इन्होव्हेशन अँड टेक्नोलॉजी ट्रान्सफर “ ( फिटी)मध्ये या प्रकल्पावर पुढील संशोधन व विकास करण्याची संधी मिळणार आहे. आयआयटी( दिल्ली) त्यांना तज्ज्ञ मार्गदर्शक देणार आहे. हे दोघे महाराष्ट्रातील एकमेव विजेते आहेत तर इतर तीन टीम बेंगलोर, गुरूग्राम( दिल्ली) व पमालू येथील आहेत.
आदिश अभिजित सशेळके व भाग्यश्री मीना हे सद्या पुण्यातील इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीचे संगणकशास्त्राचे विद्यार्थी असून त्यांनी आपल्या “ नेक्स्टप्ले -एआय” नवप्रकल्पात “क्रीड़ा क्षेत्रात तंत्राज्ञानातून सामाजिक बदल “ ( सोशल चेंज थ्रू स्पोर्ट टेक्नोलॉजी)। यावरील लक्षवेधी कृत्रिम बुध्दिमत्ता ( एआय) अभिनव प्रकल्प सादर केला . या प्रकल्पात भारतातील खेड्यापाड्यात राहणारे ९२% उपेक्षित व दुर्लक्षित प्रतिभावान क्रिडापटूंना एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शोधण्याचा मार्ग सूचविला आहे. यामुळे देशातील अत्यंत प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेता येणार आहे. क्रिडा प्रतिभा असूनही वंचित राहणारे खेड्यापाड्यातील आदिवासी – ग्रामीण युवक-युवतींचा शोध घेता आल्यास भारतीय क्रिडा क्षेत्रात क्रांती घडू शकेल तसेच ऑलींम्पिक स्पर्धेत पुढील काही दशकात भारताचे यश वाढू शकणार आहे . यामुळे भारतात सामाजिक बदल घडणार आहे. इतकेच नव्हे तर हे संशोधन जगभारातील विकसनशील देशामध्ये पण वापरता येणार आहे. “नेक्स्टप्ले -एआय“ चे जनक आदिश शेळके हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापऩशास्त्र विभागाचे संचालक प्रा. डॉ. अभिजित सुखदेव शेळके व बालरोगतज्ज्ञ डॉ. माधवी शेळके यांचे सुपुत्र आहेत. एआय तंत्रज्ञानाचे पदवी संपादन करण्यापूर्वी सामाजिक बदलासाठी केलेले संशोधन मौलिक व दिशादर्शक मानले जाते. संभाजीनगर ( औरंगाबाद) शहराचा हा तंत्रंज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय -अंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन झेप प्रेरक व गौरवास्पद मानली जाते.



