# श्री चेडोबा देवस्थानाचा सुशोभीकरण सोहळा थाटात संपन्न – कोकण न्यूज मराठी
धार्मिक व आध्यात्मिक

श्री चेडोबा देवस्थानाचा सुशोभीकरण सोहळा थाटात संपन्न

श्री भैरवनाथ गाव विकास कमिटी व ग्रामस्थ मंडळ लोहारे यांच्या वतीने आयोजन

पोलादपूर संदीप जाबडे

     नवसाला पावणारे जागृत देवस्थान अशी ओळख असणारे श्री चेडोबा देवस्थान म्हणजेच भक्तांचा लाडका बांधावला बावा. श्री चेडोबा देवस्थान देवाचा सुशोभीकरण सोहळा शुक्रवार १९ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. या अविस्मरणीय सोहळ्याला धार्मिक, राजकीय, सामाजिक, सांप्रदायीक क्षेत्रातील हजारो मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली.
नवसाला पावणारे देवस्थान अशी ओळख असणाऱ्या बांधावला बावाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून भक्तगण मोठ्या संख्येने वर्षभर दाखल होत असतात. या भक्तगणांची बैठक व्यवस्था सोयीची व्यावी यासाठी शेड, देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, देवस्थानाच्या विविध अंगांची माहिती देणारे फलक आदी बाबींचे सुशोभीकरण श्री भैरवनाथ गाव विकास कमिटी व ग्रामस्थ मंडळ लोहारे यांच्या वतीने करण्यात आले. सकाळी ८ वाजता अभिषेक, सकाळी ९ ते ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी ११ ते १२ लोहारी ग्रामस्थ मंडळाचे भजन, दुपारी १२ ते १ महाप्रसाद, दुपारी १ ते २ मान्यवरांचा सत्कार समारंभ अशी कार्यक्रमाची रुपरेषा सुशोभीकरण सोहळ्यानिमित्त पाहायला मिळाली. लोहारे गावचे सुपुत्र, रायगड जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अनिल पवार यांनी श्री चेडोबा देवस्थानाची महती सांगणारे गीत सुशोभीकरण सोहळ्यानिमित्त व्हिडिओद्वारे प्रकाशित केले.
सुशोभीकरण सोहळ्याचे आयोजन अध्यक्ष निलेश संभाजी साळुंखे, उपाध्यक्ष प्रदिप सुर्वे, सचिव अशोक नरे, खजिनदार सुरेश नरे, रामचंद्र साळुंखे, दत्ताराम पवार, समीर साळुंखे, निलेश वाडकर, हरिश्चंद्र साळुंखे, दिपक उतेकर, अमित वाडकर, राजू नरे यांसोबतच श्री भैरवनाथ गाव विकास कमिटी व लोहारे ग्रामस्थांच्या विशेष मेहनतीने करण्यात आले.

शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!