# लोकनेते भाई पाशिलकर यांची दीर्घ आजाराशी अखेर झुंज संपली, लोकनेता हरपला – कोकण न्यूज मराठी
धार्मिक व आध्यात्मिकसामाजिक

लोकनेते भाई पाशिलकर यांची दीर्घ आजाराशी अखेर झुंज संपली, लोकनेता हरपला

लोकनेता महाशिवरात्रीच्या दिवशी अनंतात विलीन

रोहा, रुपेश रटाटे

रायगडच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व, शब्दाला जागणारा लोकनेता आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे व्यक्तिमत्व, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती भाईसाहेब पाशिलकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. शनिवार रात्री १०:३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एका मोठ्या पर्वाचा अंत झाला असून

राजकारणातील ‘धगधगती तोफ’ शांत झाली आहे.

 

भाईसाहेब पाशिलकर म्हणजे रोहा तालुक्याच्या राजकारणातील एक अभेद्य किल्ला होते. आपल्या रोखठोक भाषणांनी आणि प्रशासनावर असलेल्या जबरदस्त पकडीमुळे त्यांनी ‘धगधगती तोफ’ अशी ओळख निर्माण केली होती. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकासकामांचा डोंगर उभा केला. केवळ सत्ताकारण न करता समाजकारण आणि लोकसंग्रह कसा करावा, याचा वस्तुपाठच त्यांनी नव्या पिढीसमोर ठेवला. तटकरे कुटुंबाची प्रत्येक राजकीय घडामोड भाईंच्या आशिर्वाद आणि मार्गदर्शनाखेरिज पुर्ण होत नव्हती. भाईसाहेबांच्या जाण्याने पाशिलकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धाटाव आणि रोहा तालुक्यातील जनतेसाठी ते केवळ नेते नसून एक आधारवड होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त झाली.

– हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत लोकनेता अनंतात विलीन

रविवारी महाशिवरात्रीचा दिवस असतानाही हजारोंच्या संख्येने लोकांनी भाईंच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केलेली, धाटाव येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली, यावेळी माजी आम. अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!