# पोलादपूर नगरपंचायतीचा घनकचरा थेट नदीपात्रात; नागरिकांच्या जीवाशी खेळ – कोकण न्यूज मराठी
आरोग्य व शिक्षण

पोलादपूर नगरपंचायतीचा घनकचरा थेट नदीपात्रात; नागरिकांच्या जीवाशी खेळ

आपली माती, आपली माणसं संस्थापक राज पार्टे यांनी कचरा गाडी थेट नगरपंचायतीत आणली 

पोलादपूर, संदीप जाबडे – पोलादपूर नगरपंचायतीकडून मागील काही वर्षांपासून घनकचरा थेट नदीपात्रात टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी व पर्यावरणाशी गंभीर खेळ सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व इतर कचरा साचल्याने पाळीव व भटक्या प्राण्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. अनेक प्राणी हा प्लास्टिक कचरा खात असल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

दरम्यान, आपली माती, आपली माणसं संघटनेला नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारीनंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट नदीपात्र गाठून परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला प्रत्यक्ष जागेवर येऊन ही भयावह परिस्थिती पाहण्याचे आवाहन केले. मात्र, प्रशासनाने या विनंतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. अनेक वेळा फोन वरून संपर्क साधल्यानंतरही नगरपंचायतीच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी तेथे जाणे टाळले.

 

याचवेळी नदीपात्रात कचरा टाकण्यासाठी आलेल्या वाहनाला संस्थापक राज पार्टे यांनी अडवले. त्यांनी संबंधित कचरा गाडी थेट स्वतः चालवत नगरपंचायत कार्यालय गाठत प्रशासनाचा निषेध नोंदवला. या संपूर्ण प्रकारामुळे पोलादपूरमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून तातडीने कारवाईची मागणी होत आहे. नदीपात्रातील कचरा त्वरित हटवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व घन कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी योग्य उपाय योजना कराव्या अशी मागणी जोर धरत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!