प्रवासी सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन,
सापे वामने रेल्वे स्थानकाबाबत आग्रही; तत्परतेने गैरसोय दूर करणार - आशुतोष श्रीवास्तव

महाड : मितेश नवले
महाड तालुक्यातील सापे-वामने रेल्वे स्थानक पुनर्विकासानंतर प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. उंचीचे प्लॅटफॉर्म नसल्यामुळे प्रवाशांना चढणे-उतरणे धोकादायक झाले आहे. या प्रमुख समस्येसह स्थानकाच्या सापे वामने रेल्वे स्थानकांच्या विकासात्मक मागणी करिता आम्ही सापे, वामने, नडगाव शेतकरी बहुविकासीय सामाजिक संस्था महाड यांनी नुकतीच कोकण रेल्वे कार्यालय नवी मुंबई बेलापूर येथे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड चे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांची भेट घेऊन रेल्वे स्थानक बाबत गैरसोय दूर कराव्यात या मागणीचे निवेदन दिले.
सापे-वामने रेल्वे स्टेशनच्या समस्यांबाबत निवेदन देताना संस्थेचे अध्यक्ष सुनिल जाधव, सरचिटणीस अनंत जाधव, सल्लागार नामदेव घाणेकर, प्रविण साळवी, रामु दवंडे, सुभाष धारसे आदीं उपस्थित होते.
प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्मची उंची आणि लांबी वाढविणे, स्थानिक ग्रामस्थ आणि गुरांच्या सुरक्षित हालचालीसाठी भुयारी मार्ग, वाहनांच्या वाहतुकीकरिता उड्डाणपुल उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड चे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले की, या मागणीकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. प्लॅटफॉर्मची उंची आणि लांबी वाढविणे, वाहनांच्या वाहतुकीकरिता उड्डाणपुल अशा दोन कामाकरिता निधी प्राप्त झाला असून या महत्व पूर्वक मागणीला येत्या चार महिन्यांमध्ये लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.



