विभागस्तरीय विज्ञान गणिताचा जादुगार स्पर्धेत प्रदीप पवार मुंबई विभागातून प्रथम व राज्यस्तराकरीता निवड..!!

पोलादपूर, संदीप जाबडे
शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष २०२५/२६ पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तसेच पर्यवेक्षकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा महत्त्वकांक्षी उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून राबविण्यात आला. शिक्षकांचे व्यावसायिक विकासाला प्रोत्साहन देऊन शिक्षकांना २१ व्या शतकातील कौशल्यासाठी सुसज्ज करण्यासाठी या स्पर्धकांचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करणे समन्वय, सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे तसेच डिजिटल भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
विज्ञान व गणितचा जादूगार या स्पर्धेत प्रदीप राजाराम पवार (मुख्याध्यापक, रायगड जिल्हा परिषद केंद्रीय शाळा धारवली ता.पोलादपूर) यांचा मुंबई विभागातून मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड या पाच जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून राज्यस्तराकरीता त्यांची निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेकरता मुंबई विभागाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे. त्याबद्दल त्यांचे विविध स्थरातून विशेष कौतुक होत असून सर्व हितचिंतक मित्रपरिवाराकडून भावी वाटचालीस शुभेच्छा प्राप्त होत आहेत.
प्रदीप पवार यांनी सादर केलेल्या विविध विज्ञान प्रतिकृतींची राज्यस्तराकरीता निवड झाली असून त्याबद्दल सुभाष साळुंके(गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पोलादपूर), राजेश सुर्वे(राज्याध्यक्ष,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग), विजय दरेकर(जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद माध्यमिक विभाग) व विविध शिक्षक संघटनांच्या तालुका व जिल्हा स्तरावरील हितचिंतक पदाधिकारी यांनी विशेष कौतुक करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



