सम्यक कोकण कला संस्थेचा राज्यस्तरीय सम्यक कलाभूषण पुरस्कार गायक सुदर्शन कासारे यांना जाहीर

पोलादपूर, संदिप जाबडे
सम्यक कोकण कला संस्था ही मागील पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असून कलाकारांना पाठबळ देण्यासाठी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत. यावर्षी संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने संस्थेचा वर्धापन दिन व रौप्य महोत्सव 29 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता लेन, दादर पूर्व, मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने बुध्द, शिव, फुले, शाहू, आंबेडकरी बहुजनांची चळवळ गतीमान करण्यासाठी, समाजाला प्रबोधनातून परिवर्तनाकडे नेण्यासाठी योगदान देणाऱ्या निवडक कलावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे. या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र गायक सुदर्शन कासारे यांना “राज्यस्तरीय सम्यक कला भूषण पुरस्कार” जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मंदार कवाडे यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावचे सुपुत्र, आंबेडकरी चळवळीतील अजरामर गीतांचे गायक, कोकणचा ढाण्या वाघ स्व. लक्ष्मण कासारे यांचे सुपुत्र सुदर्शन कासारे यांनी आपल्या वडिलांचा वारसा जपत ऐन तारुण्यात गायनाला सुरुवात केली. भीम गीतांचा जंगी सामना, कव्वाली, ऑर्केस्ट्रा, वाढदिवस-श्रद्धांजली कार्यक्रम आदींच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून कला क्षेत्रात ते कार्यरत आहेत. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे मुंबई मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये सुदर्शन कासारे यांनी आपल्या कलेची छाप सोडली आहे. गोड, गळ्याचे गायक अशी त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे. वडिलांप्रमाणेच सुदर्शन कासारे यांना देखील ‘कोकणचा ढाण्या वाघ’ म्हणून संबोधले जाते. महाराष्ट्राचे आजरामर कवी जनार्दन धोत्रे यांची अनेक गाणी सुदर्शन कासारे यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून गायली आहेत.
‘कधी ना कधी, या बहिणीची आठवण येईल’ हे बहिण भावाचे गीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. ‘लाडका भीम माझा बाळ त्याचा करावा सांभाळ’ हे भीम गीत, ‘चम चम चमके, माझ्या शिवाची भवानी तलवार’ छत्रपती शिवाजी महाराजांचे गीत आजही अनेकांच्या हृदयावर राज्य करत आहे. अशा या कलावंताला ‘राज्यस्तरीय सम्यक कलाभूषण’ पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


