# आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न – कोकण न्यूज मराठी
आरोग्य व शिक्षण

आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न

पोलादपूर, संदीप जाबडे

आपली माती, आपली माणसं सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. या शिबिराला पोलादपूर तालुक्यातील १७ शाळा व सुंदरराव मोरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु असूनही ६५० विद्यार्थ्यांनी या करिअर मार्गदर्शन शिबिराला उपस्थिती लावली. कार्यक्रमाला तहसीलदार कपिल घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष कृष्णा कदम, भाजपा मंडळ अध्यक्ष वैभव चांदे, पंचायत समिती पोलादपूरचे मा. सभापती दिलीप भागवत, पंचायत समिती बांधकाम विभागाचे अविनाश कांबळे, आकार प्रतिष्ठानचे संस्थापक अजय सलागरे, अध्यक्ष रामदास सकपाळ, पोलादपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुलाबराव सोनावणे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

 

 

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलींसाठी विशेष सत्रामध्ये धनश्री ठाकरे यांनी मुलींची सुरक्षितता या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात त्यांनी मुलींनी आत्मविश्वास वाढवणे, सतर्क राहणे, कायदेशीर हक्कांची माहिती ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य पावले उचलणे याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. तसेच सायबर सुरक्षितता, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर आणि अनोळखी व्यक्तींशी संवाद करताना घ्यावयाची काळजी यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. “स्वतःची सुरक्षा ही केवळ कुटुंबाची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी आहे,” असे सांगत त्यांनी पालक, शिक्षक आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले.

यानंतर रुपाली कौशिक यांनी इंडस्ट्रियल ऑटोमेशन या आधुनिक आणि करिअरदृष्ट्या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आपल्या सादरीकरणात इंडस्ट्रियल ऑटोमेशन म्हणजे काय, त्यातील PLC, SCADA, Robotics, Control Systems यांसारख्या तांत्रिक घटकांची माहिती दिली. तसेच उत्पादन क्षेत्रात ऑटोमेशनचे वाढते महत्त्व, उद्योगांमधील रोजगाराच्या संधी आणि आवश्यक कौशल्ये यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सतत कौशल्यविकास केला, तर इंडस्ट्रियल ऑटोमेशन क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवता येते,” असे आवर्जून सांगितले.

प्रमुख मार्गदर्शक डॉ. इसार कुरेशी यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीतील विविध संधी, बदलते शैक्षणिक प्रवाह, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास तसेच स्वावलंबनाच्या संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले. “आपल्या आवडी-निवडी ओळखून योग्य क्षेत्राची निवड केल्यास यश निश्चित मिळते,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष निलेश कोळसकर, कार्यवाहक अध्यक्ष चंद्रकांत मोरे, ग्रामीण अध्यक्ष हरी पवार, सचिव शिवाजी पार्टे यांसह शहरी व ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. आभार प्रदर्शनात संस्थेचे सरचिटणीस संदीप चव्हाण यांनी १७ विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचे विशेष आभार मानले. तर विद्यार्थ्यांना देखील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!