नववर्षी पहाटे मॉर्निंग क्लबने केले नियमित चालणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान
आजपासून प्लास्टिक पिशवी न वापरण्याचा केला संकल्प

रोहा : रुपेश रटाटे
रोहा येथिल मॉर्निंग क्लबने नववर्षाच्या पहाटे येथिल कुंडलिका नदी किनारी ट्रॅकवर नियमित चालायला येणाऱ्या ज्येष्ठांचा यथोचित सन्मान केला. यावेळी मॉर्निंग क्लबच्या सदस्यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून प्लास्टिक पिशवी न वापरण्याचा संकल्प केला असल्याचे अध्यक्ष प्रज्योत गुरव यांनी जाहीर केले.
रोहा शहरातील कुंडलिका नदी किनारी ट्रॅकवर सकाळी फिरायला मॉर्निंग वॉककरिता अनेकजण येत असतात, येथील मॉर्निंग क्लबने “चला आरोग्य जपूया, रोज चालण्याची सवय लावूया..” हे मंत्र देत नवीन वर्षाच्या सकाळी मॉर्निंग क्लबच्या सदस्यांनी एकत्र येत वॉकसाठी येणाऱ्या सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. वॉकिंग ट्रॅकवर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात रोहा सिटिझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितिन परब यांच्या हस्ते रविंद्र वैद्य, विजय देसाई, चंद्रकांत जाधव या नियमीत वॉकसाठी याणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सिटिझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितिन परब, मॉर्निंग क्लबचे अध्यक्ष प्रज्योत गुरव, पत्रकार मिलिंद अष्टीवकर यांनी मनोगत व्यक्त केले. मॉर्निंग क्लब मेंबर्स आजपासून प्लास्टिक पिशवी वापरणार नसल्याचा संकल्प सोडण्यात आला. क्लबचे सरचिटणीस शैलेश कोळी यांनी नियोजन केले तर रत्नाकर कनोजे सर यांनी आभार मानले. यावेळी फारुक सवाल, समिधा अष्टीवकर, गणेश सावंत, किरण गुल्हाने, प्रज्ञेश भांड, वामन चव्हाण, भाई पाटील, बाबू कडू, ऋतुराज अष्टीवकर, प्रवीण कापडी आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया ;
पहाटे चालणे ही आपली जीवनशैली व आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, इतरांनी याची प्रेरणा घेऊन सकाळी चालणे सुरू करावे असे आमचे प्रयत्न आहेत.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे अत्यंत गरजेचे आहे. याची सुरुवात स्वतःपासून करीत प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर न करण्याचा संकल्प केला आहे.
-प्रज्योत गुरव, अध्यक्ष मॉर्निंग क्लब रोहा
प्लास्टिक बंदी व्हावी यासाठी सिटीझन फोरम ट्रस्ट कायम प्रयत्नशील आहे, अशा उपक्रमातून त्याची निश्चितच जनजागृती होईल, पहाटे चालणे हा निरोगी आणि आनंदी जीवनासाठी एक सोपा व प्रभावी मार्ग आहे, जो शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, मॉर्निंग क्लबच्या माध्यमातून नवोदितांना निश्चितच प्रेरणा मिळेल.
-नितीन परब, अध्यक्ष रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट.


