# ‘प्लास्टिक पिशव्या देऊ नका’ दुकानदारांना दिले गुलाब पुष्प : नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांची गांधीगिरी – कोकण न्यूज मराठी
महाराष्ट्रविशेष वृतान्त

‘प्लास्टिक पिशव्या देऊ नका’ दुकानदारांना दिले गुलाब पुष्प : नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांची गांधीगिरी

रोहा अष्टमी शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगरपालिकेचा अभियान

प्रतिनिधी : रुपेश रटाटे

रोहा : रोहा नगर परिषदेतर्फे शहर प्लास्टिक व थर्माकोलमुक्त करण्याच्या दृष्टीने व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी “प्लास्टिक पिशव्या देऊ नका, असे म्हणत नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे व नगरसेवकांनी रोहा अष्टमीतील दुकानदारांना गुलाब पुष्प देऊन विनंती केली. पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक हटवा, शहर स्वच्छ ठेवा असा संदेश यारॅलीद्वारे नगर परिषदेकडून देण्यात आला आहे.

 

यावेळी प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नाटीकेद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. नागरिकांनी एकल वापराच्या सिंगल यूज प्लास्टिकचा वापर त्वरित बंद करण्याचे तसेच खरेदी करताना शासनमान्य जाडीच्या पिशव्याच वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. शहरातील सर्व नागरिक, व्यापारी संघटना, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांनी नियमांचे काटेकोर पालन करून रोहा अष्टमी शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष कु. वनश्री शेडगे यांनी केले आहे.

 

या रॅलीमध्ये नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुख्याधिकारी अजय एडके, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, गटनेता महेंद्र गुजर, नगरसेवक राजेंद्र जैन, अहमद दर्जी, महेश कोलाटकर, महेंद्र दिवेकर, रविंद्र चाळके, रोशन चाफेकर, पूर्वा मोहिते, अल्मास मुमेरे, निता हजारे, प्रशांत कडू, आलेफिया रोहावाला, विदुला परांजपे, सुरेंद्र निंबाळकर आदींसह नगरपरिषद कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

 

प्रतिक्रिया :

 

जनजागृती अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना कापडी, कागदी पिशव्या, स्टील अथवा काचसामग्री, पेपर बॅग, तसेच विणलेल्या पिशव्यांचा वापर करण्याची विनंती केली आहे, दुकानदार आणि नागरिकांचा योग्य प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला दंडात्मक कारवाई टाळून नागरिकांमध्ये अवेअरनेस निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

-वनश्री समीर शेडगे, नगराध्यक्षा, रोहा अष्टमी नगरपरिषद

 

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे अत्यंत गरजेचे आहे. प्लास्टिक बंदी व्हावी यासाठी सिटीझन फोरम कायम प्रयत्नशील आहे, अशा उपक्रमातून त्याची निश्चितच जनजागृती होईल, नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी दंडात्मक कारवाई टाळून जनजागृतीची ही मोहीम कायम सुरू ठेवावी.

-नितीन परब, अध्यक्ष, रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट.

 

 

– प्लास्टिक वापरल्यास हे असतील दंड –

 

प्लास्टिक व थर्माकोल वापरावर बंदी आदेशांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून सर्वसामान्य नागरिकांसाठी दंडाची रक्कम ५०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. दुकानदार, फळे व भाजी विक्रेते, व्यापारी यांच्यासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय उल्लंघनास अनुक्रमे ५ हजार, १० हजार व २५ हजार रुपये दंड व कारावासाची तरतूद आहे.

 

 

-प्लास्टिक संबंधित काय आहेत केंद्राचे निर्देश-

केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने २०२२ मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांनुसार अनेक सिंगल यूज प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल प्लेट्स, कप, चमचे, स्ट्रॉ, कटलरी, ट्रे, प्लास्टिक काड्या, मिठाई बॉक्स, आमंत्रण पत्रिकांचे प्लास्टिक आवरण, सिगारेट पाकिटांचे कव्हर आदींचा समावेश आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!