लोहारे जिल्हा परिषद मतदार संघातून सुदेश उतेकर इच्छुक
भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी मिळाल्यास ताकदीने लढणार

पोलादपूर, संदिप जाबडे
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांची आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर २०२५ रोजी अलिबाग येथे पार पडली. यामध्ये पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक(पूर्वाश्रमीचा देवळे) जिल्हा परिषद मतदार संघ नागरिकांचा मागास प्रवर्ग व लोहारे जिल्हा परिषद मतदार संघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाला.
आरक्षण सोडत पार पडल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली. यापैकी लोहारे जिल्हा परिषद मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीकडून तालुका मंडळ अध्यक्ष वैभव चांदे यांनी यापूर्वीच इच्छुकता दर्शवली असून तुर्भे गावचे सुपुत्र लोहारे विभागाचे सामाजिक कार्यकर्ते सुदेश उतेकर हे देखील लोहारे जिल्हा परिषद मतदार संघातून इच्छुक असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुदेश उतेकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. तुर्भे पंचक्रोशी, लोहारे विभागात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शेतकऱ्यांना खत यासोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवून गेल्या पाच वर्षांमध्ये सुदेश उतेकर यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे. सुदेश उत्तेकर यांनी लोहारे जिल्हा परिषद मतदार संघातून इच्छुकता दर्शवल्यानंतर भारतीय जनता पार्टीतून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. यासोबतच भारतीय जनता पार्टीची कोणत्या पक्षासोबत युती होणार आणि लोहारे जिल्हा परिषद मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाणार यावर उमेदवारीचे गणित अवलंबून आहे.



