# सुंदरराव मोरे महाविद्यालयात रा. धों. चित्रे आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न, महाडच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची वैष्णवी कदम प्रथम – कोकण न्यूज मराठी
आरोग्य व शिक्षणसामाजिक

सुंदरराव मोरे महाविद्यालयात रा. धों. चित्रे आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न, महाडच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची वैष्णवी कदम प्रथम

पोलादपूर, संदीप जाबडे

पोलादपूर येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये येथील सहयोग प्रतिष्ठानच्या विशेष सहकार्याने नुकतेच रामचंद्र धोंडदेव चित्रे स्मृती आंतर महाविद्यालयीन कोकण विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या वैष्णवी विश्वराज कदम हिने प्रथम, सुंदरराव मोरे महाविद्यालय, पोलादपूरच्या प्रथमेश पांडुरंग मोरे याने द्वितीय, तर सावर्डे महाविद्यालयाच्या रोजीना मुसा साबळे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक प्राप्त केला. वैष्णवी रमेश सकपाळ, वरदायीनी कनिष्ठ महाविद्यालय, कापडे व रोहित राजू पवार विद्यामंदिर पोलादपूर, या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्त केली. या स्पर्धेत कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध महाविद्यालयातून वीस हुन अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सदर स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.उदघाटन समारंभामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा सुनील बलखंडे व उपप्राचार्य डॉ.महेश वल्ले, स्पर्धाप्रमुख डॉ.रवींद्र सोमोशी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. वक्तृत्व स्पर्धेच्या प्रास्ताविकामध्ये प्रा. स्नेहा काळे यांनी गेली १८ वर्षाहून अधिक काळ अव्याहतपणे चित्रे वक्तृत्व स्पर्धा यशस्वीपणे सुरू असून, कोरोना कालावधीमध्ये देखील या स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या असे नमूद करून प्रा स्नेहा काळे यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून कोकण विभागाच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे अधोरेखित करतानाच प्रास्ताविकामधून महाविद्यालयाचा परिचय करून देऊन वक्तृत्व कलेचे महत्त्व देखील विशद केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रा सुनील बलखंडे यांनी चौफेर वाचन, चिंतन, मनन आणि विश्लेषण आदी गुण आत्मसात केल्यास वक्तृत्व कलेचा विकास साध्य करता येतो असे मत व्यक्त करून वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा प्रदान केल्या. सहयोग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री रमेश चव्हाण यांनी आजच्या तरुण विद्यार्थ्यांमध्ये तर्कसंगत विचार करण्याची व ते विचार स्पष्टपणे आणि योग्य शब्दात मांडण्याची कला आणि गुण विकसित व्हावेत व या निमित्ताने तरुणांमध्ये विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी या प्रमुख उद्देशाने सहयोगचे संस्थापक श्री वि.म.चित्रे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या स्पर्धेने अल्पावधीतच युवक वर्गामध्ये आदराचे स्थान निर्माण केल्याचे सांगून यासाठी महाविद्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या सहकार्यासाठी सुंदरराव मोरे महाविद्यालय व शिवाई शिक्षण संस्थेचे आभार मानले. उदघाटन कार्यक्रमासाठी सहयोग प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री सुखदेव मोरे, श्री सुभाष ढाणे, श्री सुरेंद्र जाधव, ॲड. विनय हाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमानंतर सहभागी स्पर्धकांनी स्पर्धेसाठी निर्धारित केलेल्या विद्यमान भारतीय शिक्षण व्यवस्था : वास्तव आणि अपेक्षा, भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव : सद्यस्थिती आणि आव्हाने, बदलती जीवनशैली आणि मानवी आरोग्य व घर असावे घरासारखे ….. ! या विषयांवर अभ्यासपूर्ण मनोगते व्यक्त केली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून न्यू इंग्लिश स्कूल पैठणचे माध्यमिक शिक्षक व शिवव्याख्याते श्री पांडुरंग मोरे व महाड येथील झेप नियतकालिकाचे संपादक प्रा अविनाश घोलप यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या अखेरीस दोन्ही परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाचे विश्लेषण करून त्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. वक्तृत्व स्पर्धेसाठी वेळ निरीक्षक म्हणून सौ पौर्णिमा केंगले – गायकवाड, सौ शिल्पा देशमुख – ननावरे व तंत्रज्ञान सहाय्य म्हणून डॉ राम बरकुले यांनी विशेष योगदान दिले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!