# कापडे खुर्द विकास मंडळाच्या वतीने महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी  – कोकण न्यूज मराठी
सामाजिक

कापडे खुर्द विकास मंडळाच्या वतीने महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी 

कापडे खुर्द ते पोलादपूर काढलेल्या मिरवणूकीला उत्स्फूर्त प्रतिसाद 

पोलादपूर, संदीप जाबडे

कापडे खुर्द (भिमनगर) येथे कापडे खुर्द विकास मंडळ, मुंबई/ग्रामीण यांच्या विद्यमाने भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांनी परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.

 

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ध्वजारोहणाने झाली, त्यानंतर पूजन व अभिवादन कार्यक्रम पार पडला. विविध मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर भीमनगर ते पोलादपूर दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत तरुण-तरुणी-प्रौढ-ज्येष्ठ-महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खालूबाजाच्या ठेक्यावर कापडे खुर्द येथील भीम अनुयायांनी लेझीम खेळण्याचा आनंद घेतला. पोलादपूर एस टी स्टॅन्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण केल्यानंतर एस टी स्टॅन्ड परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निळ्या झेंड्यांनी व निळ्या गुलालाने संपूर्ण वातावरण निळेमय झाले.

 

सायंकाळी जाहीर सभेत उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले व सामाजिक समतेचा संदेश दिला.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला विधागप्रमुख तानाजी निकम, चांभारगणी ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी पवार, कापडे खुर्द ग्रामपंचायतीचे उपसरपंच सोपान निकम, बौद्धजन सेवा संघ माजी चिटणीस संजय खैरे, रायगड वैभव साप्ताहिकाचे संपादक अनिल मोरे, पोलादपूर प्रेस क्लबचे सचिव संदीप जाबडे, सामाजिक कार्यकर्ते आर. के. मोरे, सामाजिक कार्यकर्ते आर. डी. मोरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निकम, सिद्धार्थ नगर सेवा संघांचे समीर मोरे, ग्रामपंचायत अधिकारी संतोष मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

कापडे खुर्द विकास मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार बी एल मोहिते यांनी आपल्या भाषणात ‘आपआपसातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले’. समाजात गटबाजी केल्याने समाजाचे नुकसान होत आहे त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मुलमंत्र कृतीत उतरविणे गरजेचे असल्याचे सांगितले. कापडे खुर्द विकास मंडळाच्या जयंती उत्सवात निमंत्रित मान्यवरांनी अनुपस्थित राहिल्याने नाराजी व्यक्त केली. महापुरुषांच्या जयंतीचे निमंत्रण प्रत्येक शासकीय कार्यालयात देऊनही शासकीय अधिकाऱ्यांना महापुरुषांच्या जयंतीचे वावडे का? असा प्रश्न उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली.

 

रात्री मनोरंजन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक राहुल शिंदे व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका दिपाली शिंदे यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कापडे खुर्द विकास मंडळ(मुंबई), कापडे खुर्द ग्रामस्थ मंडळ, जयंती उत्सव मंडळ मुंबई ग्रामीण, कापडे खुर्द ग्रामस्थ महिला मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रमाचे सभाध्यक्षपद विलास मोरे, स्वागताध्यक्ष पांडुरंग मोरे, सूत्रसंचालन तनुज मोहिते, प्रशांत मोरे व विष्णू सकपाळ यांनी केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!