कापडे विभाग प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा प्रकाश ११ निवे संघ विजेता तर श्राव्या स्मरण किनेश्वर उपविजेता
अजित चोरगे स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट फलंदाज शुभम उतेकर, उत्कृष्ट गोलंदाज नितीन जाधव ठरला

पोलादपूर, संदीप जाबडे
कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कापडे विभाग प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचे आयोजन ५, ६, ७ डिसेंबर २०२५ रोजी श्रीराम वरदायिनी क्रीडांगण कापडे बुद्रुक येथे करण्यात आले. कापडे विभाग प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वात एकूण १६ संघानी सहभाग घेतला. पोलादपूर तालुक्यातील सर्वात जुनी आणि प्रसिद्ध प्रीमियर लीग अशी ओळख असणाऱ्या कापडे विभाग प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहण्यासाठी तीन दिवस प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली.
कापडे विभाग हा पोलादपूर तालुक्यात मोठा विभाग असून या विभागात खेळाडूंची संख्या देखील अधिक आहे. कापडे विभाग प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा प्रकाश ११ निवे संघ विजेता ठरला. विजेता संघाला रोख रक्कम एक लाख रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. श्राव्या स्मरण किनेश्वर हा संघ उपविजेता, विराज ११ पायटा तृतीय तर सान्वी वॉरियर्स कापडे खुर्द संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. स्पर्धेतील मालिकावीर अजित चोरगे याला फ्रिज बक्षीस देण्यात आले तर उत्कृष्ट फलंदाज शुभम उतेकर यास स्मार्ट टीव्ही,उत्कृष्ट गोलंदाज नितीन जाधव यास स्मार्ट टीव्ही देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मनोज तळेकर,उत्कृष्ट यष्टीरक्षक गणेश शिरावले, उद्योनमुख खेळाडू सुजल तळेकर यांना देखील विशेष पारितोषिक प्राप्त झाली.
कापडे विभाग प्रीमियर लीगच्या विजेत्या संघमालकास दुचाकी यंदाच्या हंगामाचे विशेष आकर्षण ठरले. प्रकाश ११ निवे संघांचे संघमालक प्रवीण तळेकर, जगदीश तळेकर यांना दुचाकी देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे समालोचन जयेश भोसले, बाळा पवार, संदीप जाबडे, मनोज वघरे, सुरज शिंदे यांनी केले तर पंचांची भूमिका संदीप हाटे, संदीप माने, नंदू मांडे, बंटी जाधव यांनी पार पाडली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन ग्रामीण कमिटी यांनी विशेष मेहनत घेतली.



